Saturday, 10 September 2016
छोटूकाका. “मी काय सरणार होतो का मागेssss, जातोच म्हणालो मळ्यात” छोटूकाका सांगत होता आणि अण्णा, राजाभाऊ, आज्जी, संदीप आणि मी ऐकत होतो. आमचे अण्णा सत्तरीतले, छोटूकाका पाचेक वर्षांनी लहान, पण छोटूआबा ऐवजी सगळं घर छोटूकाकाच म्हणायचं, चारपाच दिवसातनं चक्कर मारणारा छोटूकाका आज सतरा अठरा दिवसांनी आलेला. तब्येतही चांगलीच उतरली होती. चांदवडला घरी गेलेला काका सांगत होता. तब्येतीची विचारपूस केल्यावर काका सांगायला लागला “अण्णा तुम्हाला सांगतोssssss, गायकवाडानं बोलवून घेतलेलं मला. विचारा कशाला ?” ही काकाची सवय काही अक्षरं उगीचच लांबवायची आणि मधून मधून प्रश्न विचारायचे, “ अरे मळ्याकडं त्याच्या कोणी फिरकेना काssssssय ?सुंदर स्त्रीची ईच्छा अपूर्ण राहिली तर मेल्यावर म्हणतात ना जखिण का डाकीण होतेssssssss, तशातला प्रकार, मळ्याकडं जाईना कोणी. अण्णा तुम्हांला सांगतोsssssss एकेक कथा, जखिण म्हणे रात्रीची फिरते मळ्याsssssssत , आता विचारा का ? तर दिसला जवान गडी की की येते जवळ , आणि बोलता बोलता हात धरते सांगत होताssssss गायकवाड, आणि दुस-या दिवशी गडी खिळतोsssssअंथरूणाला “ अण्णा आपलं मधून मधून हं, हं करत होते. “गायकवाडाला काय ठाssssऊक , हा छोटूकाका रोकडोबा तालमीत तयार झालेला गडी, गायकवाडानं विचारलsssss तसं म्हणालो, मी काय सरणार होतो का मागेsssss” काsssssय , विचारा कशाला ? “ते कळलं रे, पुढे सांग” इति अण्णा “ पण सांगीतलं मी त्याला, लेका तमाम करतो तीचं काम, काsssssssय , फक्त भटाला जेवायला दे पोटभर , विचारा कशाला ? अरे काम मी करणार ,मग मिळायला नको काहीsssss. खीरीचा बेत केलान, गायकवाडानं ,मसालेभात नका म्हणू, पु-या नका म्हणू, चौदा वाट्या प्यायलोय खीssssssssssssssssर , आणि मग गेलो मळ्यात” किर्रर्र रात्र, कळणार नाही डोळ्यात बोट घातलं तरी इतका अंधाssssssर , बसलो चिंचेखाली , विचारा कशाला?” “कशाला ?” “अण्णा, अहो जखीण ती, वड, पिंपळ , चिंच आवडीची ठिकाणंsssssss, तिथं येणार नाही तर कुठं ? खिरीनी अंमल चालू केलाssssssअंमळ, मग झालो लंबायमान तिथचं, विचारा आता पुढे काय झालंssssss?” रात्र वाढत चाललेली, भुंकत होती कुत्रीsssssss, मी निवांतच हो, येईना का , जराsssss डोळा लागलान, शेजारी चुळबुळ ऐकली, झटक्याsssssत झालो जागा.” “विश्वास बसेनाsssssss, का विचारा? अण्णा, अहो गायधन्यांची लिलु शेजारीsssssss” “चल रे बंडला नको मारू, खीर चढली असेल तूला” इति अण्णा. “शप्पथ अण्णा, सुटली म्हणाsssss, लिलुच ती, गोब-या गालाची, दोन वेण्यांची डेरेदाssssssर लिलु, रविवार कारंज्याच्या तिच्या घरावरून कितीदा मारल्यात चकराsssss, आता विचारा कशाला?” “ हं , छोटूकाका ,मी आहे इथं , चचले नाही, लक्षात ठेवा म्हंजे झालं, भर्कटलात तर चहात आलं पडणार नाही सांगून ठेवत्ये” आज्जीनी वेळीच आवर घातला.छोटूकाका मिशीतल्या मिशीत हसला. “हां , हां वैनी, कळ्ळं, तर लिलुच ती, मी तीला विचारलेssssss, इथं गं कशी?, प्रश्न विचारल्याचं बरीक सार्थssssssक झालं अण्णा, आता विचारा कसं काय ? तर अशी फक्कड लाजलीय म्हणता लिलु, आहाहा, म्हणाली छोटूssssssss एकांत रेsssss मिळणार नां. गुलाबीसर गाल आणि नाजुक ओठ , मी विरघळलोsssss” ( डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही अशा किर्रर्र अंधारात छोटूकाकाला लिलुचं एवढं सगळं कसं दिसलं असेल हा प्रश्न मनात आला तरी अण्णापुढं विचारायची टाप नव्हती ) छोटूकाका रंगात येऊन आख्यान सांगत होता “ किती वेळ बोलत बसलोssssss कळलच नाही, जीची स्वप्नं पाहीली होतीsssssss , ती अशी शेजारी, लिलु उठली थोड्या वेळानंssssss, म्हणाली चल की छोटू ,मी उठलोच लागलीच, दहा पावलं गेलो असेनsssssss तर तीनं माझा हात रे हातात धरलान गप्पकन, विचारा काय झालं असेल?” “काय झालं?” “चमकलोच मी, अण्णा, किसलेल्या बर्फासारखा हात थंssssssssडगार, क्षणात भानावर आलो, दिली आरोळी ‘जय बजरंगबली’ ‘पवनसुत हनुमानकी जय, पकडलं मनगट तिचंssss दुस-या हातानं, विचारा कशाला? “ दुस-या हातानं मनगट पकडल्यावर , हात पडला लुळा तीचाsssss, मोकळ्या हातानं वाजीवलीन फाट्टकर्न कानसुलात, आणिsssssss लिलुचा चेहरा बदलला, दह्याsssssssसारखा ठीक्कं पांढरा चेहराssssss, लाल इंगळासारखे डोळे , दात वाजवायला लागली कराकरा, संतापानं फुललेलीssssss” “छोटू , वाईट वागलास, घाsssssssस घेते म्हणत किंचाळली, थरकाप झालाsssss माझा , आता विचारा का ?, अण्णा आवाज ऐकला असता तर जीssssssव गेला असता तुमचाsssss, कायsssss?” “तुझा नाही ना गेला? पुढे…” “ती हिंस्त्र श्वापदासारखी गुरूगुरू लागली, अंगात ताकद आलेली माजलेल्या रेड्याचीssssss, मनगटावरची पकड मजबूत ठेवली होतीsssss , पण आवरेना, मग घेतले हनुमंतांचे नाव, गेलोssssss झपाट्यात पुढेsssss अन मारली करकचून मिठी” “छोटूकाका हं ssssss” आज्जीनं डोळे वटारलेच. “ तर काय सांगतोssssssss वैनी, मिठीतून सुटता येईना तीला, उसळ्या काय मारीत होती, पण दाद नाही दिली लागूssssss विचारा कशाला ? तर थोडी सैल सोडतोsssssतर मेलोच म्हणून समजाsssss, घ्या कशाला विषाची परिक्षा ? घामानं अंग थबथबलेलं पण सोssssssडली नाही जखिणीस , अडीच ताssssssस, पहाटवारं सुटलं तशी म्हणाली , छोटूकाका सोडा मलाsssss, पुन्हा नाही त्रास देणार कुणाला, एकदा फाट्टकर्न कानसुलात वाजीवलीन दिलंsssssss सोडून , अण्णा, काम केलं तमाम “ “ हां एक मात्र झालं , तिला पकडून ठेवताना ताकद संपली माsssssझी, गायकवाडानं पाय पकडले, म्हणालाssssss काय करू छोटूकाका तुम्ही सांगा मी करतो, आता विचारा काय मागीतलं मी ?” “काय मागीतलं ?” “ अहो अण्णा, काय मागणारsssss, खीरीचं जेवण जेवलो होतो ना? कामास आलो तोच आनंदssss, पण अशक्तपणा जाणवतोsssssय” त्या दिवसापासून छोटूकाका मला शूर वीर वाटायला लागला. प्रत्यक्ष जखिणीचं काम तमाम करणारा काका आपल्या अण्णांशी गप्पा मारायला येतो , ह्या अभिमानाने माझा चिमुकला ऊर भरून यायचा. दीडेक महिन्यानी गायकवाडकाका घरी आल्यावर विषय निघालाच, ठो ठो ठो हसत गायकवाडकाका म्हणाले,” चौदा वाट्या खीर खाल्ली पठ्ठयानी, पण पचायला नको, ढेंढाळत होता तीन दिवस, इज्जत जायला नको म्हणून चांगलीच कथा रचली, चांगला कथेकरी दिसतोय छोटूकाका, मानलं त्याला, माझ्या मळ्यात या एकदा अण्णा, दिसलीच जखीण तर पाठवू छोटूकाका कडे ख्यँ ख्यँ ख्यँ “
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment